Friday, May 4, 2018

कोसला

कोसलाबद्दल थोडक्यात काही लिहिणं अवघड आहे. पु लं नी म्हटल्याप्रमाणे 'कोसलावर कोसलाइतकंच लिहिता येईल', किंवा मग काही लिहूच नये. 

आत्ता नुकतंच वाचून संपवलं; ही तिसरी-चौथी तरी खेप असेल. अधुन मधून डोकावणं तर चालू असतंच. तिचतिच पुस्तकं पुनः पुन्हा वाचणं हे तसं चांगलं. खूप पुस्तकं एकेकदा वाचणं हे फेसबूकवर खूप मित्र असल्यासारखं आहे. ऐनवेळी ते काही कामाला येत नाही. 

खोल, शांत, अंधाऱ्या रात्री मी कोसला वाचत बसलोय असं अनेकदा आठवतं. जेव्हा दिवसाची पुटं गळत जातात, आणि नवे साक्षात्कार होतात. अर्थात हे झोप न येणाऱ्यासाठी (उदाहरणार्थ आता रात्रीचे दीड वाजलेत). झोप येणाऱ्यानी झोप घ्यावी, आणि दिवसांची पुस्तकं वाचावीत.

कोसलाचा पहिला परिचय मी अकरावी-बारावीला असताना झाला. माझं इलेक्ट्रॉनिक्स होतं, पण रूममेटचं मराठी. आणि पुस्तकांचा इतका दुष्काळ होता की त्याचं पाठ्यपुस्तक मीच आधी वाचून काढलं. त्यात सांगवीकर अजिंठ्याला जातो तो भाग एका धडयात होता. अर्थात काही भाग गाळून.

आणि सांगवीकर. हा शहराला पण वैतागतो आणि गावाला पण. काॅलेज वर पण उखडतो आणि नोकरी वर पण. हा एक जुळणारा धागा म्हणता येईल. पण एवढंच नाही. आणि जे आहे त्यात खोटेपणाचा अंशही नाही.

No comments: