Monday, September 5, 2016

अपूर्वाई

मी अपूर्वाई वाचलं नव्हतं ही गोष्ट पण बऱ्यापैकी अपूर्व म्हणता येईल. पण शाळेत कधी हे पुस्तक मिळालं नाही, आणि बरेच दिवस दुकानात पण दिसत नसे. तो योग या वीकएंडला आला. पु लं. चा हा पहिला परदेश प्रवास. लंडन, पॅरिस, थोडंसं जर्मनी असा. त्यात मग ऑक्सफर्ड-केम्ब्रिज आहे, पण त्यापेक्षाही स्टेटफोर्ड-एट-एव्हन आहे. शेक्सपिअरच्या समाधीवर गदगदून जाणं आहे. पार्लमेंट मध्ये चर्चिलला पाहणं आहे. मादाम तुसॉच्या प्रदर्शनात कंटाळणं आहे. कार्लाइलचं घर पाहताना केलेलं मूक चिंतन आहे.  नेपोलियनच्या 'चिमण्या शिलेदाराच्या' समाधीवर करुण होणं आहे. आणि मी हे फक्त पु लं बद्दल नाही बोलतोय. वाचता वाचता हे सगळं गदगदनं, मूक चिंतन, कंटाळणं, करुण होणं, मी देखील अनुभवलं. आणि हो, आपल्या विसंगतीवर, हळुवारपणे पण नेमकं बोट ठेवणं, आणि हसवता हसवता कुठेतरी विचार करायला लावणं  हे आहेच. अर्थात हा अनुभव पु लं च  प्रत्येक पुस्तक देतं, तो मात्र अपूर्व नाही.