अतुल पेठे हे प्रायोगिक रंगभूमीवरच एक प्रसिद्ध नाव. पण 'नाटकवाल्याचे प्रयोग' हे पुस्तक वाचण्याआधी हे नाव मला फारसं परिचित नव्हतं. प्रायोगिक नाटक करता करता आलेल्या अनुभवांबद्दलचे लेख आणि मुलाखती यांचा हा छोटासा संग्रह. पण जर हे पुस्तक फक्त नाटकासंबंधी असतं तर मला कदाचित ते इतकं आवडलं नसतं. नाटक या माध्यमातून जीवन समजून घेण्याचा प्रयत्न हा खरं तर विषय. आणि हे नाटक मग वेगवेगळी रूपं घेतं. माहिती अधिकार आणि आरोग्य, नेमाडे आणि तेंडुलकर, फुले आणि सॉक्रेटीस अशा अनेक विषयांना स्पर्श करतं. भाषा सरळ आणि मांडणी तर्कशुद्ध, उगीच भावनिक कल्लोळ नाही. आलेल्या अडचणी, फसवणारे लोक याबद्दल लिहिलंय पण कडवटता नाही. भेटलेल्या दिग्गजांबद्दल आदराने लिहिलंय पण वारेमाप स्तुती नाही. मन विदीर्ण करणाऱ्या आजच्या आर्थिक, सामाजिक वास्तवाबद्दल लिहिलंय पण त्यामध्ये हे असं का आणि त्याबाबतीत मी काय करू शकतो हा विचार प्रधान. आणि त्या विचारांची खोली आणि समग्रता दोन्ही जाणवतात. अतिशय वाचनीय आणि शिकण्यासारखं बरंच काही.
No comments:
Post a Comment