Saturday, April 5, 2014

Reading this week: 2

अभय बंग यांच 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे पुस्तक मी नुकतच संपवलं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक, गडचिरोलीच्या आदिवासी भागात राहून रुग्णसेवा देणारे डॉक्टर, व्यसनमुक्तीसाठी काम करणारे कार्यकर्ते अशी ओळख असणाऱ्या  डॉ. बंग यांना वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी, कोणतेही बाह्य कारण नसताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. वैद्यकीय उपचार तर झालेच, पण त्यांना प्रश्न पडला कि हा विकार खरोखरीच अचानक झाला का? कि तो पूर्वीपासून होतच होता अन एक दिवस फक्त अचानक जाणवला? त्यांच्याच शब्दात सांगायच म्हणजे 'हृदयरोगामुळे माझ्या जीवनात सुरु झालेला शोध मला हृदयरोगापलीकडे घेऊन गेला. नंतर तर तो शोधच मध्यवर्ती झाला'. त्या शोधाची कहाणी म्हणजे हे पुस्तक.

आपल्या विकाराचं कारण शोधताना एक महत्वाची जी गोष्ट त्यांना आढळली ती म्हणजे हृदयरोग म्हणजे फक्त हृदयाचा आजार नव्हे तर तो पूर्ण जीवनपद्धतीचा आजार आहे. कोलेस्ट्रोल हे त्याचं एक कारण. पण ताणतणाव, शरीरश्रमाचा अभाव, आजच्या स्पर्धात्मक जीवनात येणारं एकटेपण आणि खिन्नता हि देखील महत्वाची कारण आहेत. मग उपचार या सर्वांवरच हवेत. आणि या सर्व मंथनातून त्यांचा शोध सुरु झाला. आहारात बदल झाले, व्यायामासाठी चालणं आणि योगासनं सुरु झाली.  पण मनासाठी काय? इथे लेखकाचं लक्ष ध्यान आणि योगाकडे वळलं. पण यात कर्मकांड, अंधश्रद्धा नाही. थोरांच मार्गदर्शन घेऊन पण सोबत स्वतः विचार आणि प्रयोग करून वाटचाल सुरु झाली. आणि हळूहळू  या क्षणात न राहता भरकटणारं मन, विचारांच्या वावटळी यातून मार्ग दिसू लागला. जीवनाविषयी प्रेम वाढलं, लहान गोष्टींत किती आनंद लपला आहे त्याची जाणीव झाली. सत्य, ईश्वर, जीवनाचा हेतू याबाबतच्या कल्पना बदलत गेल्या, अधिक संपन्न झाल्या. भ्रमाशी लढण थांबलं, जगणं सुरु झालं. आणि हे सर्व वाचताना मला ती शांतता लाभली जी मी जवळपास विसरूनच गेलो होतो.

म्हणून असं वाटतं कि प्रत्येकानं आवर्जून हे पुस्तक वाचावं. स्वतःच्या शोधाची ही कहाणी तुमच्या माझ्या प्रवासात मार्गदर्शक ठरेल, थोडीफार तरी दिशाहीन भटकंती वाचवेल असा मला भरवसा वाटतो.   


No comments: