गंगाधर गाडगीळांच 'एका मुंगीचे महाभारत' हे आत्मचरित्र मी नुकतंच संपवलं.
एखाद्या लेखकाने केलेलं इतकं सूक्ष्म आणि तपशीलवार आत्मनिरीक्षण मी तरी
पूर्वी नाही वाचलं. हे आत्मनिरीक्षण प्रामुख्याने त्यांच्या
साहित्यनिर्मितीच्या संदर्भात केलेलं आहे, पण त्याने त्याची वाचनीयता कमी
झाली असेल असं मात्र समजू नका. सामाजिक आणि वैयक्तिक परिस्थितीतून आपले
विचार कसे घडले याचं गाडगीळांनी अतिशय उत्कृष्ट विवेचन केलं आहे. आपली
साहित्यनिर्मितीची प्रक्रिया त्यांनी तपशीलवार सांगितली आहे. एका विचारी
तरुणाच्या मनात उठणारी आंदोलनं बरोबर पकडली आहेत. काही मोजक्या साहित्याचं
रसग्रहण केलं आहे. आणि याशिवाय त्या काळातले
साहित्यिक वादविवाद, वेगवेगळे मतप्रवाह याबद्दलचं बरचंसं सांगितलं आहे. मी
पुस्तकं जरी बरीच वाचली असली तरी साहित्य या गोष्टीविषयी फार विचार, निदान
जाणीवपूर्वक, केला नव्हता. साहित्य, त्याचं जीवनामधील स्थान, त्याच्या
चांगुल-वाईट पणाचे निकष, त्यामध्ये सामजिक जाणीव असलीच पाहिजे का, ते
नेहमीच लेखकाचं जीवनविषयक तत्वज्ञान सांगत का, साहित्य अनुभवातून जन्म
घेतं, मग लेखकाने मुद्दाम जाऊन नवे अनुभव घ्यायला हवेत का, हे आणि असे
अनेक प्रश्न, आणि गाडगीळांचे त्याबाबतचे विचार यांची ओळख हे पुस्तक
वाचताना झाली. आपले विचार हवे तसे कागदावर उतरवणं किती कठीण आहे याचा
थोडाफार अनुभव मला
आहे, गाडगीळांना सुद्धा हे म्हणताना पाहून मन जरा सुखावलं. आयुष्य ज्या
काही गोष्टी लादून आपल्याकडून करवून घेतं, त्यांची माझी नावड देखील मला
तिथे आढळली. पुस्तक वाचता वाचता त्यातल्या आवडलेल्या ओळी अधोरेखीत करायची
मला एक सवय आहे, या पुस्तकात अशा ओळी आणि परिच्छेदांचा खच पडला आहे. या
सगळ्या गोष्टींमुळे हे पुस्तक वाचणं हा एक समृद्ध करणारा
अनुभव ठरला. गाडगीळांच मी वाचलेलं हे पहिलंच पुस्तक. पण हे शेवटचं नक्कीच
ठरणार नाही.
जाता जाता ज्यांनी पुस्तक सुरु होतं त्या ओळी द्यायचा मोह आवरत नाही,
"आपलं जीवन ही एक महाभारतासारखीच कथा आहे अशी उत्कट जाणीव प्रत्येकाला असतेच असं नाही. पण मला मात्र थोडं जाणतेपण आल्यापासून माझंच नव्हे तर माझ्या आसपासचं सर्व जीवन ही एक महान कथा आहे, नव्हे, कथासागारच आहे असं उत्कटतेनं जाणवत राहिलं आहे. या अनंत कथासागरावर माझ्या जीवनाच्या इवल्याश्या होडक्यातून मी केलेल्या मुशाफिरीची ही कथा आहे."

No comments:
Post a Comment